#wari2019: पहिले रिंगण! 

देवगड दिंडीच्या सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांची फेडली पारणे 

नेवासा – संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्‍यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या आषाढीवारी पायी दिंडीचे नेवासेच्या माऊलीच्या नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दुपारी आगमन झालेल्या या दिंडीने ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात देवगड दिंडीचे पहिले रिंगण सादर झाले. वारकऱ्यांच्या या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या दिंडीचे नेवासा नगरीत नेवासा एस. टी. स्टॅंड प्रांगणात दिंडीचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत आगमन झाल्यानंतर एस. टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिंडीचे फटाक्‍याच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत केले. स्वागतासाठी कापडी कमान व भगवे ध्वज एस. टी. स्टॅंड परिसरात लावण्यात आले होते.
यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत दिंडीने वारकरी संप्रदायाची पताका हाती घेत रिंगण सादर केले. त्यानंतर वारकऱ्यांचे रिंगण, एस. टी. कर्मचाऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले. बदामबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक सादर करून विठ्ठल रुख्मिणीचा देखावा यावेळी सादर केला.

नेवासा एस. टी. आगाराच्या वतीने आगारव्यवस्थापक दादासाहेब महाजन, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, विजय गांधी, बाळासाहेब जोंधळे, वाहतूक नियंत्रक योसेफ गायकवाड, नाथबाबा मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर जायगुडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांनी पालखी पूजन करून गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे स्वागत केले. आमदार बाळासाहेब मुरकुटे मित्र मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा भेट देऊन अशोक टेकणे, बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी एस.टी. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते दिंडीची महाआरती करण्यात आली. यावेळी नेवासा एस. टी. कॅन्टीनच्या विजय यादव व दुधउत्पादक संघटनेच्या वतीने आदिनाथ पटारे, बब्बूभाई बागवान, सुभाष पवार, बाबासाहेब पंडित, नंदू दहातोंडे, संदीप गायके, बाळासाहेब ससे यांच्या वतीने दिंडीला चहाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भरपूर पाऊस पडू दे, बळी राजा सुखी होऊ दे अशी मागणी विठुरायाच्या चरणी आपल्या भाषणात बोलतांना केली. यावेळी वाहतूक निरीक्षक हंसराज आदिक, बाळासाहेब आढाव, माजी आगारव्यवस्थापक सुरेश देवकर, नगरसेवक राजेंद्र मापारी, डॉ. सचिन सांगळे, बाळासाहेब जोंधळे, रिक्षा संघटनेच्या वतीने कचरू राजगिरे, बबनराव ओनावळे, वरिष्ठ लेखनिक वासुदेव आव्हाड, संतोष नलगे, गोरक्षनाथ दिवटे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर आगार व्यवस्थापक दादासाहेब महाजन यांनी आभार मानले.

दिंडी नेवासा शहरात गेली असता मौलाना अबुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेच्या वतीने जाकीरभाई शेख यांच्या समवेत गफूरभाई बागवान व मुस्लिम समाजातील युवकांनी स्वागत केले. नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्षा संगिता बर्डे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने नगरपंचायत चौकात उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्व नगरसेवकांनी दिंडीचे स्वागत केले.

क्रांतिकारी शेतकरी पक्ष व शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीनेही दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने अशोक गुगळे, बाळासाहेब आढाव, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संजयभाऊ सुखधान, शिवसेनेच्या वतीने नितीन जगताप, अंबादास लष्करे, संजय चिंतामणी, विजय गांधी, प्रेस क्‍लबचे अध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, प्रवाशी संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनिल ताके व सचिव सुधीर चव्हाण यांनी स्वागत केले. मुथा मेडिकल परिवाराच्या वतीने दिंडीला अल्पोपहार देण्यात आला. तर रात्री संतोष शिंगी, भिकचंद शिंगी यांच्या वतीने दिंडीला भोजन देण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.