लाहोर – पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना सध्या भारतीय संघावर टीका करण्याची सवयच जडली आहे. मात्र, यावेळी माजी कसोटीपटू प्रशिक्षक वकार युनुसने केलेल्या टीकेचा वचपा काढताना नेटकऱ्यांनी वकारला चांगलीच चपराक लगावली आहे.
भारतीय संघाने 2018 साली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या वेळी झालेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 असा मालिका विजय मिळवत इतिहास घडविला होता. मात्र, या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वार्नर नव्हते त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला अन्यथा या मालिकेचा निर्णय वेगळा लागला असता, असे मत व्यक्त करत वकारने भारतीय संघाला लक्ष्य केले.
दोन वर्षांनी वकारने हे मत व्यक्त केले असल्याने सध्या पाकिस्तानच्या खेळाडूंना काही काम नाही हे सिद्ध होत आहे. भारतीय संघावर किंवा एकूणच भारतावर टीका केल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. पाकिस्तानने परदेशात कीती विजय मिळविले याचा आधी अभ्यास कर मगच भारतीय संघावर टीका कर. वकारसारख्या काही लोकांना सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवयच जडली आहे. त्यातही भारतावर टीका केली की लगेच 24 तास वाले माइक घेउन त्यांच्या मागे धावतात व फुकटी प्रसिद्धीही देतात, अशा शब्दात नेटकऱ्यांनी वकारला ट्रोल करताना आपला संताप व्यक्त केला.
करोनाच्या धोक्यामुळे सध्या क्रिकेटसह सर्व क्रीडा स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत तसेच ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात सर्व खेळाडू आपापल्या घरातच आहेत. मात्र, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सतत प्रसिद्धी मिळविण्याचे व्यसनच लागले आहे. जावेद मियांदाद, इम्रान खान, रमीज राजा यांच्या पंक्तीत आता वकारही दाखल झाला आहे. विनाकारण इतिहासातील सामन्यांचे समिक्षण करायचे व भारतीय संघावर टीका करायची हेच धोरण गेल्या काही दिवसांपासून या खेळाडूंचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
वकारची अखिलाडूवृत्ती
अनिल कुंबळेने 1999 साली दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या डावात 26.3 षटकांत 74 धावांत पाकिस्तानचे सर्वच्या सर्व 10 गडी बाद केले होते. या सामन्यात कुंबळेने जेव्हा 9 वा गडी बाद केला तेव्हा वकार, वसिम अक्रमसह खेळपट्टीवर होता. त्यावेळी कुंबळेचा एकाच डावात 10 गडी बाद करण्याचा विक्रम होऊ नये यासाठी त्याने आपल्यापैकी एकाने धावबाद होऊ किंवा अन्य गोलंदाजाच्या गोलंदाजीवर बाद होऊ असा प्रस्ताव अक्रमला दिला होता. त्यावेळी अक्रमने असे काही करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. ही घटना खुद्द अक्रमनेच काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितली होती. आज नेटकऱ्यांनी याच घटनेला उजाळा देत वकारला फटकारले आहे. स्वतः खिलाडूवृत्ती दाखवायची नाही आणि दुसऱ्यावर टीका करण्याचे उद्योग बंद कर, अशा शब्दात वकारला चपराक लगावली आहे.