Nagar Crime | जायचं होतं कोकणात…! पोचले तुरूंगात…!!

नगर (प्रतिनिधी) – शिरूर कासार तालुक्यातील तरुण पुण्यात कंपनीत कामाला होते. कोकणात फिरायला जाण्यासाठी त्यांनी एक प्लॅन आखला. पण, पुरेसे पैसे नव्हते. मग त्यांना एक युक्ती सूचली. नगरमध्ये एका मोटारीत प्रवाशी म्हणून बसले आणि मोटारकार चालकाला लुटले आणि थेट जेलमध्ये गेले.
अधिक माहिती अशी, गेल्या आठ दिवसांपूर्वी माळीवाडा बसस्थानक परिसरातून प्रवाशी म्हणून बसलेल्या एका टोळीने मोटारकार चालकाला लुटले.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. अवघ्या चोवीस तासांत कोतवाली पोलिसांनी पुणे व शिरूरकासार येथून चार जणांच्या टोळीला गजाआड केले. ती टोळी सध्या कोठडीत आहे. केवळ कोकणात फिरायला जाऊन मौजमजा करण्यासाठी आरोपींनी लूट केल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यातील एक आरोपी नगरमध्ये शिक्षणासाठी काही दिवस होता. तर, पुण्यामध्ये मिलिटरी अ‍ॅकॅडमीत ही काही दिवस शिकत होता. त्याचे गावाकडी काही मित्र पुण्यात कंपनीत कामाला होते. त्यामुळे ते एकत्रच राहत होते.

लॉकडाउनमध्ये दोघे गावाकडे राहत होते. त्यांनी कोकणात फिरायला जायचे ठरविले. पण, त्यासाठी पैसे नव्हते. नगरमधून एखाद्या वाहनात बसून ते पळवून नेण्याचे ठरले. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी दोघे शिरूरकासार येथून नगरमध्ये आले. तर, दोघे पुण्यातून नगरला आहे.

नगरमध्ये आल्यानंतर माळीवाडा बसस्थावरजवळून त्यांनी राहुरीला जाण्यासाठी भाडोत्री मोटारकार घेतली. नगर-मनमाड रस्त्यावर नांदगाव फाटा येथे मोटारकार गेल्यानंतर उलटी आल्याचे सांगून चालकाला मोटार थांबविण्यास सांगितले. चालकाने मोटार थांबविल्यानंतर त्यांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून मागच्या सिटला बांधले. त्याच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून खिशातील एटीएम कार्ड काढून घेतले आणि पासवर्डही विचारून घेतला.

मोटारकार निंबळक बाह्यवळण रस्त्याने घेऊन नगर-पुणे रस्त्यावरील सुप्याजवळ निर्जनस्थळी चालकाला सोडून दिले. ती मोटारकार त्यांनी पुण्यात निगडी परिसरात ठेवली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. केवळ मौजमजा करण्यासाठी त्यांनी दरोड्याचा गुन्हा केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

वाईट संगतीचा परिणाम

गुन्ह्यातील सर्व आरोपी विशीतील तरुण आहेत. एक आरोपी चांगल्या सदन घरातील आहे. पण, त्याला संगत चांगली नसल्याने तो गुन्ह्यात अडकला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.