350 जागा जिंकण्याचा योगींचा दावा; 45 जागा मिळाल्या तरी खूप झाले- अखिलेश

लखनौ – आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशात 350 जागा जिंकेल असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तर भाजपला 45 जागा मिळाल्यात तरी खूप झाले असा पलटवार माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.

सोमवारी एका मुलाखतीत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की एखादी व्यक्ती असो वा समाज त्याचे जिवंतपणाचे खरे लक्षण असते ते चर्चेत राहणे. आज उत्तर प्रदेश हे असेच चर्चेचा विषय असते. अर्थात राज्याची पूर्वीही चर्चा व्हायची. मात्र ती नकारात्मक कारणांसाठी. मात्र गेल्या चार वर्षांत या चर्चा सकारात्मक झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताचा हा नवा उत्तर प्रदेश आहे असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, बंगाल आणि आसाम या राज्यांत भाजपचे पूर्ण बहुमताने सरकार येईल व याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कर्मयोगी आहे अन त्याने सातत्याने काम केले आहे. आम्ही नेते नाही. तर कार्यकर्ते म्हणूनच प्रत्येक ठिकाणी जात असतो. एकेकाळी बंगालची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या तोडीची होती. आज त्या राज्याची काय स्थिती झाली आहे असा सवाल त्यांनी केला.

उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात शेतकरी आंदोलनाचे वातावरण तापले आहे. महापंचयतींचे आयोजन केले जाते आहे. त्यासंदर्भात विचारल्यावर योगी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही संवेदनशील आहोत. मात्र मोदींचे नेतृत्व त्या शेतकऱ्यांच्या आकलनापलिकडचे आहे. आजपर्यंत कोणी असे काम केले नव्हते. आता काम केले आहे तर त्याचे परिणामही दिसून येतील.

शेवटी कृषी कायदे तर शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठीच आणले गेले आहेत. मग त्याला विरोध कशाला असे त्यांनी विचारले. उत्तर प्रदेशात तब्बल 182 सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत व रोज राज्यात 172 कोटींची गुंतवणूक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबद्दल ते म्हणाले की आम्ही प्रक्रियेतील क्‍लिष्टता संपवली आणि पारदर्शीपणा आणला.

दरम्यान, त्यांच्या या दाव्यांवर अखिलेश यांनी टीकास्त्र सोडले आहे. करोना काळात योगी सरकारचे पितळ उघडे पडले आहे. आजारी पडल्यानंतर रूग्णालयात गेलेल्या प्रत्येकाला तेव्हा आपल्या राज्याची काय स्थिती आहे ते समजले. राज्यात एवढी दुर्दशा पूर्वी कधीच झाली नव्हती. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. वेतनात कपात झाली आहे. मात्र हे सरकार दावा करतेय की दरडोई उत्पन्न वाढले आहे अशा शब्दांत अखिलेश यांनी लक्ष्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.