वाल्हे – करोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून बंद असलेले वाल्हे (ता. पुरंदर) येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने शुक्रवार (दि. 15) पासून सुरू होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ग्रामस्थ व व्यावसायिक यांची संयुक्त बैठक झाली.
यावेळी ग्रामस्थांच्या सहमतीने शासकीय नियमांचे पालन करीत सलूनची दुकाने व हॉटेल वगळता इतर सर्व दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गर्दी रोखण्यासाठी काही ठिकाणी रस्ते बंद केले होते.
बंद केलेले रस्ते खुले करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सर्व व्यावसायिकांना सोशल डिस्टन्सचे पालन करीत मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रत्येक ग्राहकांचे नाव तसेच मोबाइल क्रमांक व पत्ता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.