बावडा -बावडा व परिसरातील ग्रामस्थांनी आरोग्याची चांगली सोय व्हावी यासाठी बावडा येथे सुसज्ज रूग्णालय उभारण्यात आले आहे, मात्र ही इमारत गेल्या तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय गावातच उपलब्ध व्हावी या दृष्टीने बावडा (ता. इंदापूर) येथे सुसज्ज असे रूग्णालय उभारले आहे. हा रूग्णालय सुरू झाल्यास जुन्या रूग्णालयावरील भार कमी होऊन नवीन रूग्णालयात नीगरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत. या इमारतीला रंग रांगोटी, आतील फर्निचर व लागणारे सर्व साहित्य जिथल्या तिथं लावण्यात आले. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आतमध्ये लावण्यात आलेले पंखे, दिवे, फर्निचर आदी बरेच साहित्य चोरीला गेल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून तयार असल्याने गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषदेकडूनही काना डोळा होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकच अधिकाऱ्यांवर काम भागवले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 25 ते 30 गावांचा भार आणि कर्मचारी अपुरे त्यामुळे अचानक रुग्ण वाढल्यास कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होते.
नवीन इमारतीत ग्रामीण रुग्णालय चालू होणार असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात काही सुधारणा करता येत नाहीत असे पण जिल्हापरिषद प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हे रूग्णालय लवकरात लवकर चालू करण्याची मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे. हे रूग्णालय सुरू झाल्यास नागरिकांची होणारी हेळसांड थांबून गरजेनुसार योग्य औषधोपचार मिळतील. ही इमारत अनेक वर्षांपासून धुळखात पडून उभा असल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे रूग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
- राजकीय वादात सापडले ग्रामीण रुग्णालय
बावडा येथील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण रुग्णालय राजकीय वादात तर अडकले नाही, ना अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. कारण रुग्णालयाची मंजुरी, भूमिपूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमांतून झाले. त्यानंतर यातील आतल्या इमारतीचे भूमिपूजन सध्याचे राज्यमंत्री व तत्कालीन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले होते. त्यामुळे उद्घाटन नेमके कुणी करायचे? या वादात तर इमारत धूळखात पडली नाही ना? अशी चर्चा नागिकांमध्ये रंगत आहे. - बावडा येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत सध्या कर्मचारी, अधिकारी भरती सुरू करण्याती आली आहे. संपूर्ण कर्मचारी भरती पूर्ण झाल्यावर पुढील एक, दोन महिन्यात बावडा ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची गैरसोय दूर होण्यास चांगली मदत होईल.
-दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री, सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन, मत्स्य विकास व सामान्य प्रशासन.