शिरूर-हवेलीतून मेगाभरतीसाठी ‘वेट ऍण्ड वॉच’

भाजपच्या गळाला बडा नेता लागणार?

पुणे – राज्यभर चाललेले “मेगाभरती’चे लोण जिल्ह्यापर्यंत आले नसले तरी आगामी काळात या मेगाभरतीसाठी काही “लाभार्थी’ इच्छुकांनी तयारी केली आहे. विधानसभेच्या तोंडावर प्रचंड उलथापालथ होऊन वेगवान घडामोडी घडणार आहे. इतर पक्षांमधील बड्या नेत्यांना आपल्या “गळाला’ लावून घेत भाजपकडून “धक्‍कातंत्र’ाचा अवलंब होण्याची शक्‍यता आहे.

शिरूर-हवेलीत युतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. तरीही गावपातळीवर ताकद राष्ट्रवादीची आहे. लोकसभेलाही या मतदारसंघातून राष्ट्रवादीला मताधिक्‍य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आहे. हा प्रभाव विधानसभेपर्यंत टिकविण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह दोन्ही तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांवर आहे. लोकसभा निवडणुकीत या नेत्यांनी अगदी खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम अतिशय निष्ठेने केल्याचे दिसले. एरवी विस्तवही न जोणारे नेते अनेक सभांमध्ये मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहायला मिळाले. मताधिक्‍य कोणामुळे वाढणार, त्याचीच चलती विधानसभेला असणार हे जो-तो जाणून होता. लोकसभा निवडणूक झाली तो इतिहास झाला. आता वेळ आहे ती विधानसभा निवडणुकांची. या निवडणुकीसाठी मतदारसंघातून तिघेजण प्रबळ दावेदार आहेत. या दावेदारांपैकी पहिली लढाई असेल ती तिकीट मिळविण्याची. तिकीट मिळाले म्हणजे निवडणूक सोपी आहे असे नाही. त्याला इतरांना (अर्थात नाराजांना) सोबत घेऊन काम करण्याची कसरत पेलावी लागणार आहे. अशावेळी दगाफटाका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशावेळी भाजपसारखा पक्ष गळ टाकून तयार आहे. कोणता नेता गळाला लागणार याचीच केवळ औपचारिकता आहे.

ऍड. पवार यांची भूमिका निर्णायक
माजी आमदार अशोक पवार हे राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले होते. तर दुसऱ्या निवडणुकीत लाटेमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. तरीही मनाने खचून न जाता पक्षातील संघटन अणखी मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती यामध्ये घवघवीत यश मिळवले. मतदारसंघात त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आहेत. असे असले तरी यावेळी हवेलीला संधी द्यावी, या मागणीने जोर धरला आहे. अशावेळी ऍड. पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

चितपट कोण होणार?
खर्डा वक्‍ता अशी ओळख असलेले व राजकारणातही भल्याभल्यांना चितपट करणारे मंगलदास बांदल यांची ताकद सर्वश्रुत आहे. भाजपकडून त्यांनी विधानसभाही लढवली आहे. वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे. संख्याबळ नसताना सभापतिपद मिळवले. लोकसभेची तयारी त्यांनी केली होती; मात्र आपल्या नेत्याच्या शब्दाला मान देत त्यांनी माघार घेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. आता विधानसभेला ते माघार घेणार का? पुन्हा एकदा भाजपवासी होऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार हे लवकरच कळेल.

राष्ट्रवादीची कसोटी
किती दिवस थांबायचे? हा प्रश्‍न कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांना विचारत आहेत. मागीलवेळी इच्छुक असताना विद्यमान आमदारांना डावलून तिकीट देणे पक्षाला संयुक्‍तिक वाटले नाही. मात्र यावेळी हवेलीला संधी मिळालीच पाहिजे यावर कार्यकर्ते ठाम आहेत. वेगळी वाट धरा प्रसंगी अपक्ष लढा असा आग्रह कंद यांना होत आहे. हवेलीबरोबरच त्यांचा शिरूर तालुक्‍यात मोठा जनसंपर्क आहे. भाजपनेही उमेदवार बदलायचा ठरवल्यास त्यांना जनाधार असलेले नेते हवेच आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची तर कंद यांच्या निर्णयक्षमतेची कसोटी असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×