मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी साजरी

सातारा – येथील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधूंच्या मुरलीधर मंदिरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त वेदमूर्ती माधवशास्त्री भिडे यांच्या पौरोहित्याखाली सकाळी षोडशोपचार पूजा, पवमान पंचसुक्‍त पठण झाले. त्यानंतर रामकृष्ण पाठशाळेच्या भगिनींचे विष्णूस्रनाम, भगवद्‌गीता, मधुराष्टकम्‌ व श्रीकृष्ण स्तोत्रांचे पठण झाले.

रात्री जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पूजा,जन्मकाळ, जन्मअध्याय निरुपण, सहस्र तुलसीदल अर्पण, महाभिषेक, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले. संगमरवरी कृष्ण मूर्तीच्या मागे पुण्यातील कारागीरांनी बनवलेली चांदीची प्रभावळ, चांदीचा कोरीव देव्हारा व गजांतलक्ष्मीचे नक्षीकाम असलेले चित्र आकर्षण ठरत आहे. उद्या, दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता सौ. विद्या दिवशीकर यांचे लळिताचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून जन्माष्टमी उत्सवाची सांगता होणार आहे. सुरेश दिवशीकर, संदीप दिवशीकर, सचिन दिवशीकर, स्वानंद दिवशीकर, सुमेध दिवशीकर, वारुंजीकर गुरुजी यांनी उत्सवाचे संयोजन केले.

दरम्यान, खण आळीतील मारवाडी राधाकृष्ण मंदिर, करंजेतील महानुभाव मठ, हमदाबाज येथील इस्कॉनचे राधकृष्ण मंदिर, नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरात, गिरवी, ता. फलटण येथील कृष्ण मंदिर, गोंदावले येथील ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर समाधी मंदिरातील गोपालकृष्ण मंदिर येथे जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×