अनिल काटे
वाई : वाई तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरवात केली आहे. परंतु, उपाययोजना करण्यास तालुक्यातील प्रशासन हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी आल्यावर फिल्डवर बाहेर पडणारे प्रशासकीय अधिकारी इतरवेळी वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
सद्यस्थितीमध्ये वाई तालुक्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही, ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात कमतरता आहे, व्हेंटिलेटर बेडचे तर विचारायचेही नाही, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. एचआरसीटी टेस्टसाठीसुद्धा वेटिंग आहे. रेमडेसिविर इंजेक्शन तर गायबच आहे, का गायब केले आहे याचे जनतेला कोडे पडले आहे. सर्वसामान्य करोनाबाधित रुग्णांकरता तयार केलेले मॅप्रो कोविड सेंटर अजूनही सलाईनवर ठेवले असल्याने सर्वसामान्यांच्या मानगुटीवर करोनाचे “भूत” बसले आहे. कोरोना विषाणूच्या तावडीत सापडलेल्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड प्रमाणात हाल सुरु आहेत, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यासह वाई शहर व तालुक्यात कोरोनाने तांडव सुरू केले आहे. जिल्हा हाऊसफुल दुसरीकडे वाई तालुका हाऊसफुल. कुठेही जागा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइक हतबल आहेत. ऑक्सिजन बेड व इंजेक्शनवाचून अनेकजण करोनाची शिकार ठरू लागल्याने कुटुंबेच्या कुटुंबे पोरकी होऊ लागली आहेत. तरीही प्रशासन गांधारीच्या भूमिकेतून बाहेर पडत नाही. तालुक्यात इतकी गंभीर परिस्थिती असताना नागरिकांच्या मदतीसाठी एकही प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरलेला पाहयला मिळत नाही. लोकप्रतिनिधी आल्यावर फक्त कागदी घोडे नाचवत दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. पिचलेल्या नागरिकांना सेवा देण्याऐवजी वातानुकूलित कार्यालयात बसून मेवा खाण्यात वाईतील सगळेच प्रशासकीय अधिकारी दंग झाले आहेत, अशी चर्चा वाई तालुक्यात सुरू असून त्यांना कोणीतरी अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलीस व आरोग्य विभागाचे प्रशासन सोडले तर इतर प्रशासनातील प्रमुख अधिकारी कार्यालयात बसून खालच्या कर्मचाऱ्यांना फर्मान सोडत आहेत. वाईमधील प्रशासन निष्काळजीपणे वागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय बेजबाबदार वागण्यामुळेच आजमितीला वाई तालुक्यातील सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल सुरु आहेत. एचआरसीटी तपासणीसाठीसुद्धा पहाटेपासून रांग लावावी लागत आहे. तरीही नंबर लागत नाही. तीच परिस्थिती कोविडच्या लसीकरणाची आहे.
शहरात एकच लसीकरण केंद्र असल्याने लस घेताना जनतेला मरणोत्तर अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड विचारायचीसुद्धा सोय राहिलेली नाही. रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात गेल्याने गायब झाले आहे. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तरी वाई प्रशासन फक्त बघ्याची भूमिका वटवत आहे.
मॅप्रो कोविड सेंटर अजूनही सलाईनवरच
कोरोना काळात गेल्या वर्षी तयार केलेले वाई- सुरूर रस्त्यावरील मॅप्रो गार्डनजवळील जवळपास 30 ते 40 बेडचे हॉस्पिटल अजून सुरु करण्यात प्रशासनाला यश आले नाही. कोरोनाने वाई तालुक्याला एक महिन्यापूर्वीच वेढा घातला असताना निव्वळ वाई तालुका प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे मॅप्रो कोविड सेंटर सुरू करायला मुहूर्त सापडत नसल्याने कोविड सेंटर अजूनही सलाईनवरच राहिली आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी फोन येत आहेत, कोणालाही काहीही उत्तर देता येत नाही, अशी अवघड परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाला हलवून मिळेल तिथे रुग्ण दाखल करण्याचा नातेवाइकांचा अक्षरशः केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. या धावपळीत करोना रुग्णांचे हकनाक बळी जाऊ लागले आहेत. या घटनांचा विचार करता “बैल गेला झोपा केला’ अशी अवस्था वाई तालुक्यात झाली आहे.