वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. मकरंद पाटील यांनी जनतेच्या आरोग्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून विशेष तरतूद करत वाई व खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयांना दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका दिल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्याने करोनाच्या वाढत्या संकटात आरोग्य विभाग व मतदारसंघातील जनतेची मोठी सोय झाली आहे.
वाई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यातील अनेक बाधित रुग्णांना अतितातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण व खाजगी रुग्णालयांकडील सध्याच्या रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. परिणामी अनेक अत्यवस्थ रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करणे त्यांच्या नातेवाइकांना जिकरीचे होत होते.
ही बाब लक्षात घेऊन आ. मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याने सुसज्ज व अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दोन रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या आधी पाचगणीतील नागरिकांसाठी आ. पाटील यांनी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. करोनाच्या संकटातत दोन रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिल्याने जननायक ही बिरुदावली आ. पाटील यांनी सिद्ध केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अंदाजे 22 लाख रुपये किमतीच्या या अत्याधुनिक रुग्णवाहिका आ. पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्या.
उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, दीपक ओसवाल, भारत खामकर, प्रदीप चोरगे, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, राजेश गुरव, प्रदीप जायगुडे, शहराध्यक्ष मामा देशमुख, माजी सभापती महादेव मस्कर, कृषिभूषण शशिकांत पिसाळ, तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रताप पवार, शशिकांत पवार, जिल्हा बॅंक संचालक नितीन पाटील, बाळासाहेब चिरगुटे व कार्यकर्ते उपस्थित होते.