वाई – हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वाई शहासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात जागोजागी लावण्यात आलेले भगवे झेंडे व पताकांमुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
सकाळी दहा वाजता वाई शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सजवलेल्या रथातून घोडे, लेझिम, झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीता मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग घेतला. “जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांनी शहरासह संपूर्ण तालुका शिवमय झाला होता.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्यावतीने आयोजित केलेल्या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन व शिवप्रतिमेचे पूजन आमदार मकरंद पाटील, अभिनेत्री अश्विनी महांगडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डी. टी. शिर्के, सिनेट सदस्य ऍड. जगदीश पाटणे यांनीही भेट दिली.
ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले तर यावेळी बचत गटाच्या स्टॉलचेही उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी पारंपरिक वाद्य वादनाचा कार्यक्रम, हालगी, तुतारी, ढोल ताशा यांचा समावेश असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात व सर्व शासकीय कार्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.