उंब्रज – छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी चा जयघोष व ढोल ताश्यांच्या गजरात येथील जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलीच्या शाळेत रथातून छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. उंब्रज, ता. कराड येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा परिधान करत शिवपुतळयाची मिरवणूक काढली.
या मिरवणुकीला शाळेच्या प्रांगणातून सुरू करण्यात आली. पारंपारिक वेशभूषा केलेली मुले त्यांच्या हातातील भगवा ध्वज व ढोल ताश्याचा गजर करत मिरवणुकीत सहभागी झाली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी हा जयघोष करण्यात आला. मिरवणूक एसटी स्टॅन्ड, माणिक चौक मार्गाने मुख्य बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचली. सर्वानी पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य उपस्थितांसमोर मांडले. शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.