नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला हतबल करून सोडले आहे. त्यासाठी परदेशातून मदतीचा ओघ देखील सुरु होत असल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी या कोरोनाने आरोग्य यंत्रणेचे कंबरडेच मोडले आहे. अनेक कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, बेड यांची कमतरता जाणवत असूनही रुग्णवाहिकादेखील अपूऱ्या पडत आहे. आतापर्यंत अनेक जणांचा रुग्णवाहिके अभावी मृत्यू झाला आहे. म्हणूनच भोपाळमधील एका रिक्षाचालकाने एक स्तुत्य असा उपक्रम सुरु करून रुग्णसेवेचे व्रत घेतले हाती असेच म्हटले आहे.
सध्या सोशल मीडियावर भोपाळमधील या रिक्षाचालकाची जोरदार चर्चा रंगली आहे. जावेद असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये रुग्णवाहिकेप्रमाणे सोयी सुविधांची व्यवस्था केली आहे. “रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण जात असल्याच्या अनेक घटना सोशल मीडिया व बातम्यांच्या माध्यमातून कानावर येत होत्या. त्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आणि समाजाप्रतीचं कर्तव्य म्हणून मी रिक्षामध्ये रुग्णावाहिका करण्याचा निर्णय घेतला”, असे जावेद यांनी सांगितले.
MP: An auto driver in Bhopal has converted his auto into an ambulance & takes patients to hospitals for free. Javed, the driver, says, "I saw on social media & news channels how people were being carried to hospitals due to the shortage of ambulance. So I thought of doing this." pic.twitter.com/eaH4CpWGBO
— ANI (@ANI) April 30, 2021
“रिक्षामध्ये रुग्णवाहिकेची सोय करावी यासाठी मी माझ्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले. बराच वेळ ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी रांगेत उभा राहतो. तसंच गरजू रुग्णांना वेळात मदत मिळावी यासाठी मी माझा संपर्क क्रमांकदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे रुग्ण व त्यांचे नातेवाईक या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून मी हे काम करत असून आतापर्यंत ९ गंभीर अत्यावस्थेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवलं आहे.”
दरम्यान, जावेद यांनी त्यांच्या रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, मास्क अशा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर जावेद व त्यांच्या रुग्णवाहिका रिक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे.