अहमदाबाद – सलामीवीर पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. कोलकाताने दिलेले 155 धावांचे आव्हान दिल्लीने 16.3 षटकातच 3 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा करत पार केले. यावेळी दिल्लीच्या सलामीवीरांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम फोडला.
पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात तब्बल 24 धावा कुटत कोलकाताच्या मनसुब्यावर पाणी फेरले. कोलकात्याविरुद्ध पृथ्वीने फक्त 41 बॉलमध्ये धडाकेबाज 82 धावांची खेळी केली. आणि आपल्या संघाला विजयासमीप नेले. या सामन्यादरम्यान पृथ्वीने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले.
मात्र, सामना संपल्यानंतर कोलकाता आणि दिल्लीचे खेळाडू एकमेकांशी चर्चा करत असताना शिवम मावीने मस्करीने पृथ्वी शॉचा गळा दाबला तसंच पृथ्वीच्या शानदार खेळीचं कौतुक देखील केलं. पृथ्वीने मावीच्या 6 चेंडूवर मैदानातील चारही कोपऱ्यात शानदार 6 चौकार लगावले होते. पृथ्वीने केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले.