मंचर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आंबेगाव विधानसभा मतदार संघातील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय व संस्थामधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाबाबत सुशिक्षित करण्यासाठी कार्यालयामध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पथकप्रमुख सुनिल भेके यांनी सांगितले.
मंचर येथील शरद सहकारी बॅंकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीत लोकशाही परंपरांचे जतन करुन धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भिडपणे व निःपक्षपातीपणे मतदान करण्याची संकल्प शपथ देण्यात आली. या प्रसंगी जनजागृती पथकाचे सदस्य विजय घिसे, सचिन तोडकर, विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटाडे, सोपान सैद, संदीप बोंबले, सावकार असगडे, सुरेश रोंगटे, अभिजित नाटे, मंगेश जावळे, दिनकर बांबळे उपस्थित होते. आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती फेरी, पथनाट्य, मतदान संकल्प शपथ, विविध शालेय स्पर्धा, मतदान संकल्पपत्र भरुन घेणे, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत.