पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागाची तोडफोड करणाऱ्यांना मतदार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. प्रभागाची रचना कशीही केली असली तरी कॉंग्रेसचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील आणि महापौर कॉंग्रेसचाच होईल, असा दावा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली. त्यानंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रभागरचेवर भाष्य केले. तसेच निवडणुकीसाठी कॉंग्रेस तयार असल्याचे सुतोवाच केले. यावेळी बोलताना कदम म्हणाले, शहरातील प्रभागरचना करताना अनेक ठिकाणी जाणिवपूर्वक तोडफोड करण्यात आली आहे.
चुकीच्या पद्धतीनेही काही ठिकाणी रचना करण्यात आली आहे. विरोधकांवर कुरघोडी करण्याचा यातून प्रयत्न झाला असला तरी देखील शहरातून कॉंग्रेसचेच सर्वाधिक नगरसेवक निवडणूक येतील आणि महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता येईल. महापौर देखील कॉंग्रेसचा असणार आहे. सत्तेचा फायदा उठवत काहीजणांनी आपल्यालाच कसा फायदा होईल याची काळजी घेत प्रभाग रचना करून घेतली आहे.
तरीदेखील जनता कॉंग्रेसलाच मतदान करून निवडून देणार आहे. शहराच्या विकासात कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कोणी कितीही आणि कशाही पद्धतीने प्रयत्न केले तरी महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचेही कदम म्हणाले.