पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागाचे आराखडा निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे. तीन सदस्यीय पद्धतीमुळे पूर्वीच्या प्रभागरचनेत बदल झालेले आहेत. परंतु, त्याचा कोणताही फरक राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पडणार नाही. पिंपरी-चिंचवडकरांनी आता शहराचा पुढचा महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच करायचं ठरवलेलं आहे. शहरातील नागरिक या निवडणुकीत भ्रष्टाचारी भाजपला घरचा रस्ता दाखवतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिका निवडणूक यंत्रणेमार्फत सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभागरचना मंगळवारी प्रसिद्ध केली. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना संजोग वाघेरे म्हणाले, महापालिकेने एकूण 46 प्रभागाचे आराखडे जाहीर केलेले आहेत. त्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी मुदत दिलेली आहे. आयोगामार्फत तयार करण्यात आलेल्या या प्रभागरचनेत तीन सदस्यीय पद्धतीमुळे आणि नगरसेवकसंख्या वाढल्यामुळे अनेक बदल झालेले आहेत.
असे असले तरी प्रभागरचना आणि शहरातील मतदारांचा कल हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीने अनुकूल आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतत्वावरच शहरवासियांचा विश्वास आहे. भाजपच्या नेतेमंडळींनी 2017 मध्ये खोट्या भुलथापा देऊन सत्ता मिळवली. परंतु, पाच वर्षांच्या सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार जनतेने पाहिला आहे.
जनतेचे हिताचे निर्णय न घेता चुकीचे निर्णय सातत्याने भाजपने घेतले. त्यात शहरातील जनता भरडली आहे. प्रत्यक्षात कचरा, पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते विकासाच्या बाबतीत भाजपला काही करता आलेले नाही. पंतप्रधान आवास योजनेतून एकही घर उभे राहिले नाही. भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे स्मार्ट सिटी बदनाम झाली. ज्या अनधिकृत बांधकामे, शास्तीकरासारख्या प्रश्नावर नागरिकांना वाऱ्यावर सोडण्याचे काम भाजपने केला. याचा हिशोब महापालिका निवडणुकीत शहरातील नागरिक चुकता करणार आहेत. जनतेने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय घेतलेला आहे.