दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या

मतदान झाले… आता दिवाळी खरेदीसाठी लोकांची लगबग वाढणार
आली दिवाळी; किराणा मालाबरोबरच कापड दुकांनामध्ये होणार गर्दी

सातारा – विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि आता सर्वांनाच दिवाळीची चाहूल लागली असून पावसानेही उघडीप दिल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजू लागली आहे. कापड खरेदीबरोबरच किराणा माल, फटाके, आकाशकंदिलांसह विद्युतरोषणाईसाठी दिव्यांच्या माळा खरेदीसाठी लगबग वाढू लागली आहे. पगार आणि बोनसची रक्कम हाती आल्याने लोकांमध्ये खरेदीसाठी उत्साह आहे.

पूर्ण ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण होते. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली तरी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला होता. दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज होती. मात्र, खरेदीचा उत्साह दिसत नव्हता. शनिवारी प्रचार थांबला आणि दिवाळीपूर्वीचा रविवार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. मात्र, रविवारी पावसाची संततधार कायम राहिल्याने बाजरपेठेत त्याचा परिणाम जाणवला.

सोमवारी मतदान असल्याने मतदानाची लगबग सकाळपासून सुरू होती. सकाळी लवकर मतदानाचे कर्तव्य बजावून काही जणांनी खरेदीसाठी बाजारपेठ गाठली. दिवाळीसाठी किराण माल घेण्याबरोबरच फराळाचे तयार पदार्थ घेण्याकडे आता कल वाढू लागला आहे. त्यामुळे मिठाई दुकानदारांचीही तयारी सुरू होती. आकाशकंदिल, विद्युतरोषणाईसाठी दिव्यांच्या माळांना मागणी वाढली आहे. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त दुचाकीसह चारचाकी वाहने, दुरचित्रवाणी संच, धुलाई मशीन, ओव्हन अशा वस्तूंच्या खरेदीची उलाढालही वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. उद्या मंगळवारपासून बाजारपेठा गर्दीने फुलून जातील. निवडणुकीचा माहोल संपून लगेचच दिवाळी असल्याने खरेदीचे प्रमाण आणखी वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात ग्राहकांकडून खरेदीसाठी विशेष प्रतिसाद नसल्याने व्यापारी चिंतेत होते. आता पगार आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्ग खरेदीसाठी बाहेर पडेल. आजही दिवाळीच्या खरेदीस सुरवात झाल्याचे चित्र शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत दिसले. आकाशकंदिल, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर होता. डी मार्टमध्येही ग्राहकांची संख्या मोठी होती. याबाबत कापड व्यावसायिक म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढण्यास सुरवात झाली आहे. लहान मुले आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी केली. पुढील काही दिवसांत दिवाळीसाठी खरेदी वाढेल. येत्या दोन दिवसांत बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)