वाई – वाई पालिकेला मैला व्यवस्थापन हा प्रकल्प स्तुत्य असा ठरत असून देशभरासह परदेशी पाहुणे या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येत आहेत. नुकतेच बांगलादेश येथील उच्च पदस्थांनी वाई पालिकेच्या या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आहे. सेप्ट विद्यापीठ आणि टाईड टेक्नोक्रॅट्स यांच्या मदतीने आणि बिल व मिलिंडा गेट्स फौंडेशन यांच्या अनुदानातून वाई नगरपरिषद मैला प्रक्रिया प्रकल्प व कालबद्ध रितीने शौच टाक्या उपसणे हे काम यशस्वीपणे राबविले आहे.
वाई पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाला भेट देण्यासाठी देशी तसेच परदेशी पाहुणे आवर्जुन येत असतात. नुकतेच भारतातील प्रायोगिक तत्वावरील या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेल्या बांगलादेशमधील पाहुण्यांचे पालिकेच्या मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.
बुधवार, 20 रोजी एस. एन. व्ही. नेदरलंडस डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीनैदा व कुश्तीया या बांग्लादेशमधील दोन शहरांच्या नगरपालिकांच्यावतीने वाई शहरातील मैला व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देण्यात आली.
यावेळी या नगरपालिकांचे महापौर मो. सैदुल करीम मिंतू तसेच नगरपालिकेचे सचिव मो. मुस्ताक अहमद, कर निरीक्षक मो. अफताब उद्दीन, मो. अमान उल्लाह, कार्यकारी अभियंता मो. रबिऊल ईस्लाम, शहर समन्वयक मो. अब्दुल हलीम, मो. फैजूर रेहमान, सरकारी सल्लागार मो. शाहीदुल ईस्लाम, आयसीटी प्रमुख साद अहमद व न. प. सदस्य मो. हेलाल उद्दीन उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी वाई शहरातील कालबद्धरितीने शौच टाक्या उपसण्याचे प्रात्यक्षिक पाहिले. मैला प्रक्रिया प्रकल्पाचे कामकाज कसे चालते याचाही त्यांनी अभ्यास केला.
या दरम्यान त्यांनी वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. हा प्रकल्प राबविताना कोणत्या अडचणी आल्या, कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या अशा त्यांच्या विविध शंकांचे निरसन वाई पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केले.
नगरपरिषदेच्या चालू असलेल्या कामांमध्ये कोणकोणत्या अडचणी नागरी व्यवस्थेमध्ये आहेत, सदरच्या प्रकल्पाचे आर्थिक व्यवस्थापन नगरापालिकेद्वारे कसे केले जाते तसेच बांगलादेश मधील परस्थिती आणि भारतातील परिस्थिती यावर सविस्तर चर्चा केली. येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत त्यांनीही काही मार्गदर्शन केले. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालय निरीक्षक नारायण गोसावी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता क्रांती वाघमळे, करनिरीक्षक अभिजित ढाणे, आरोग्य निरीक्षक गुणवंत खोपडे तसेच सेप्ट विद्यापीठाचे प्रतिनिधी अर्वा भारमल, भूषण टवलारे, जीनल छेडा उपस्थित होते.