सातारा – सैन्यात भरती करतो असे आमिष दाखवत भारतीय सेना दलातील जवानानेच तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सुरज विजय घोरपडे (रा. पोगरवाडी, ता.सातारा) या तरूणाने दिलेल्या तक्रारीवरून अजित संपत भोसले (रा. व्हिजन सिटी कॉलनी, तामजाईनगर) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज घोरपडे सैन्यात भरतीसाठी प्रयत्न करत असतानाचा त्याच्या भावाच्या दुकानात काम करत होता. त्याचवेळी जवान भोसले याची व घोरपडे याची ओळख झाली. त्यावेळी भोसले याने आपण सैन्य दलात नोकरीस असून मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याची बतावणी केली. त्याच्यावर विश्वास ठेवत घोरपडे याने त्याला सैन्यात भरती करण्यासाठी मदत करण्याची विनंती भोसले याला केली.
त्यानंतर सैन्यात भरती करण्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतील, असे भोसले याने सांगितले होते. घोरपडे याने घरातील लोकांशी चर्चा करून सोन्याचे दागिने गहाण ठेवत सातारा शहरातील भू-विकास बॅंक चौकात डिसेंबर 2018 मध्ये भोसले याला तीन लाख रुपये दिले. त्यानंतर कोल्हापूर येथील भरतीत तुझे काम करतो, मला तुझी कागदपत्रे द्यावी लागतील व बाकी पैसे भरतीच्या निकालाआधी द्यावे लागतील, असे भोसले याने सांगितले.
कोल्हापूर भरतीचा निकाल लागण्याआधी फेब्रृवारी 2019 मध्ये भोसले याने पुन्हा पैशाची मागणी केल्याने घोरपडे याने विकास सेवा सोसायटीतून कर्जाने घेतलेले एक लाख 60 हजार रूपये भोसलेला दिले. मात्र, कोल्हापूर भरतीचा निकाल लागल्यानंतर घोरपडे याचे नाव न आल्याने त्याने भोसले याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घोरपडे याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तक्रार केल्यानंतर भोसले याने घोरपडे याला दोन लाख 30 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, भोसले याने दिलेला धनादेश त्याच्या खात्यात पैसे नसल्याने वटला नाही. त्यामुळे घोरपडे याने भोसले याच्या विरोधात चार लाख 60 हजारांच्या फसवणुकीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.