कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी साहित्याला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा ४४ वा स्मृतिदिन आज शिवाजी विद्यापीठातील वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे भावपूर्ण वातावरणात झाला. यावेळी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्या हस्ते खांडेकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, वि.स.खांडेकर तथा भाऊ यांचे साहित्य म्हणजे विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठित तसेच स्वदेश भावयुक्त होते. त्यांचा साहित्याचा खजिना विद्यापीठाने आत्मियतेने जपला आहे. खांडेकरांची साहित्य संपदा विचारवंत, अभ्यासक, विद्यार्थ्यांपर्यत अधिकाधिक पोहोचविणे हेच आमचे उदिष्ट आहे.
यावेळी वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, मराठी विभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ते नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.