ICC World Cup 2023 : टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे भारताचे तिसऱ्यांदा जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले.
विश्वचषकात विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहलीने 11 सामन्यात 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, या चमकदार कामगिरीसाठी विराट कोहलीला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देखील देण्यात आला.
या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य होती. इंडियानं सर्व 10 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 6 गडी राखून सहज पराभव केला.
दरम्यान, या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने एकूण 19 तास 56 मिनिटं फलंदाजी केली, पण तरीही टीम इंडियाच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
याआधी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 18.51 तास फलंदाजी करण्याचा विक्रम केला होता.
भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत 18.50 तास फलंदाजी करण्याचा विक्रम केला होता, मात्र आता विराट कोहलीने हा देखील विक्रम आपल्या नावावर केला आहे.
याशिवाय विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या तर यंदा कोहलीनं 765 धावा केल्या आहेत.