pune news : एकुलती एक मुलगी मात्र, लग्नानंतर तिने पतीसह आपल्याकडेच रहावे असे सरकारी नोकर असलेल्या पित्याला वाटायचे. तर घरजावाई कसे बनू मी स्वतंत्र्य आहे. स्वतंत्र्यच राहणार, मी माझा स्वाभिमान गहाण नाही ठेवणार, असे पतीला वाटायचे.
यामध्ये जन्मदात्या पित्याचे ऐकू कि जीवनसाथी असलेल्या पतीचे ऐकू या विवंचनेत पत्नी अडकली. मात्र, यामध्ये उमदीचा काळ असलेला तब्बल 15 वर्षे गेली. मात्र, 15 वर्षानंतर वकिलांनी केलेल्या समुपदेशनाला यश आले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला. तिचे वडील वारले आहेत. पती-पत्नी आणि दोघांची आई, असे चौघे आता एकत्र राहत आहेत.
माधव (वय 55) आणि माधवी (वय 49) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघांना ऍड. राहुल हनुमंत जाधव यांनी समुपदेशन केले. तो व्यावसायिक आहे. तर ती गृहिणी आहे. ती आई-वडिलांची एकुलते एक आपत्य. 2006 मध्ये दोघांचा विवाह झाला. वाद, स्वभावातील मतभेदामुळे ते 2008 पासून विभक्त राहू लागले. तिचे वडील सरकारी नोकर होते.
त्यांना मुलीने आपल्याकडेच कोल्हापूर येथे जावयासह राहावे, असे वाटत होते. तर त्याला घरजावाई होणे मान्य नव्हते. सासऱ्याच्या संपत्तीचे घेणे-देणे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये कुणाचे ऐकू अशा आडकित्यात ती अडकली होती. 2015 साली प्रयत्न केल्यानंतर दोघे एकत्र आले. पतीने पत्नीला सोन्याचा 4 तोळ्यांचा हार केला.
मात्र, जेमतेम 5 ते 6 महिनेच संसार टिकला. पुन्हा विभक्त राहू लागले. दरम्यान तिचे वडील वारले. नवरा घटस्फोट घेण्याच्या इच्छेने वकिलांकडे आला. वकिलांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केला. दोघांचा एकामेकांवर विश्वास असल्याचे वकिलांच्या लक्षात आले.
त्यांनी केलेली चूक दोघांच्या लक्षात आणून दिली. त्याने तिच्या आईला सांभाळायचे मान्य केले. तिची आई, त्याची आई आणि दोघे आता एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. तर वडिलाच्या संपत्तीचेही दोघेच वारस असल्याचेही वकिलांनी निदर्शनास आणून दिले.
अलीकडच्या काळात एक अपत्य असणाऱ्या दांपत्यांची संख्या मोठी आहे. लग्नाच्या वेळीच जावयाला मुलाची जबबदारी स्विकारावी लागणर आहे, याबाबत कल्पना दिली पाहिजे. तसेच तिलाही त्याच्या आई-वडिलांची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लग्नानंतर वडिलधाऱ्यांना सांभाळण्यावरून दांपत्यात वाद होणार नाहीत तसेच आयुष्याच्या शेवटी मुलीच्या आईवडिलांची हेळसांड होणार नाही.
– ऍड. राहुल हनुमंत जाधव, दांपत्याचे वकील