पिंपरी – एका दुचाकीस्वाराने नो-पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली. तसेच त्या दुचाकीस्वाराने फॅन्सी नंबरप्लेटही लावली होती. त्याचाही वाहतूक पोलिसांनी दंड आकारला. मात्र फॅन्सी नंबरप्लेटमुळे वाहतूक पोलिसांचीही फसगत झाली. त्यांनी दुचाकीच्या दंडाचा मेसेज एका मोटारच्या मालकाला पाठविला. त्यासोबत दुचाकीचा फोटोही पाठविला आहे. यामुळे वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
कासारवाडी येथे राहणाऱ्या दिनेश जवळकर यांच्याकडे एमएच-14-एफयू-46 ही चारचाकी मोटार आहे. त्यांना वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचा दोनशे व फॅन्सी नंबरप्लेट लावल्याचाही एक हजार असा एकूण बाराशे रुपयांचा दंड आकारल्याचा मेसेज पाठविला आहे.
दंडाचे ऑनलाइन चलन पाठविताना वाहतूक पोलिसांनी चारचाकी ऐवजी दुचाकीचा फोटो पाठविला आहे. या फोटोमध्ये दुचाकीचा पासिंग क्रमाक जवळपास एकच असल्याचे दिसत असले तरी दुचाकी चालकाने फॅन्सी नंबरप्लेट लावून एमएच-14-एफयू-3746 असा क्रमांक असताना मोठ्या अक्षरात फक्त 46 लिहिले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुचाकीचा नंबर व्यवस्थित न पाहिल्यामुळे फक्त एमएच-14-एफयू-46 असाच नंबर वाचला. त्यामुळे दुचाकीच्या मालकाऐवजी जवळकर यांना दंड आकारण्यात आला आहे.
रद्द केला होता दंड
24 जुलै रोजी घरकुल, चिखली येथील एका रिक्षा चालकाला अशाच चुकीच्या पद्धतीने दंड आकारला होता. याबाबत दैनिक “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिसांनी आपली चूक मान्य करीत त्या रिक्षावरील दंड रद्द केला.
वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंगचा आणि फॅन्सी नंबरप्लेटचा दंड आकारला आहे. पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेट व्यवस्थित पाहिलेली नाही. त्यांनी फक्त मोठे अक्षर असलेला 46 एवढाच क्रमांक पाहिला. वरील बाजूस लिहिलेल्या 37 या नंबरकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. मी हा नाहक दंड का भरू? पोलिसांनीच हा दंड रद्द करावा.
-दिनेश जवळकर, चारचाकी वाहन मालक