लोणंद – लोणंद येथे रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बॉम्बसदृश स्फोटके डुकराने खाल्ल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात डुक्कर ठार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
लोणंद शहरात रेल्वे स्टेशन परिसरात कोणी तरी डुकरे मारण्यासाठी चेंडूच्या आकाराचे गावठी बॉम्ब परिसरात टाकल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता ही स्फोटके खाल्ल्याने एका डुकराच्या जागेवरच मृत्यू झाला. यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात मोठा आवाज झाला. घटनेनंतर लोणंद पोलीसांकडून घटनास्थळी स्फोटकांचा कसून शोध घेण्यात आला.
तर दुपारनंतर सातारा येथील बॉम्बशोधक पथकाकडूनही रेल्वे स्थानक परिसरात श्वानाच्या मदतीने स्फोटकांचा शोध घेऊन सुमारे 17 बॉम्बसदृश गोळे नष्ट करण्यात आले. यावेळी लोणंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. हे गावठी बॉम्ब टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घेत आहेत.