Vikrant Messi : अभिनेता विक्रांत मेस्सीचा चित्रपट 12 वी फेल चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात मुख्यभूमिकेत असलेल्या विक्रांतच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत नव्या सिनेमासाठी सज्ज झाला आहे. लवकरच विक्रांत ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात दिसणार आहे. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर आता ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात विक्रांत एका खास भूमिकेत दिसणार आहेत.
27 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत विक्रांत मेस्सीने लिहिले की, 22 वर्षांपूर्वी गोध्रा ट्रेन आगीत प्राण गमावलेल्या 59 निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहतो. ‘द साबरमती रिपोर्ट’ 3 मे 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी नवीन प्रोजेक्टसाठी त्याचे अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
या सिनेमात विक्रांत मेस्सी एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे, जो गोध्रा घटनेचे वार्तांकन करताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्यासमोर असलेल्या टेलिप्रॉंटरवर गोध्रामध्ये घडलेली ही दुर्घटना आहे, असा उल्लेख असतो. तेव्हा तो त्याच्या वरिष्ठांना ही दुर्घटना नाही, असं ठामपणे सांगतो. आणि पुढे टिझरमध्ये गोध्रा आणि साबरमती एक्सप्रेसचे रिअल फुटेज दिसतात. यात विक्रांत शिवाय राशी खन्ना, रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत आहेत.
एकता कपूरने या सिनेमाची निर्मिती केली असून रंजन चंडेल सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा 22 वर्षांपूर्वी 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला जाळण्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल आहे. हा चित्रपट 3 मे 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.