पिंपरी – विधानसभेसाठी आपण राष्ट्रवादीकडे तिकीटाची मागणी केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आपण जोरदार तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी मला का डावलले याचे उत्तर मला अद्यापही मिळालेले नाही. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, पिंपरीतील विकासकामे मार्गी लावणे आणि जनतेला न्याय देणे यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून मतदारांच्या ताकदीवर आपण जिंकणार सुद्धा असा दावा शेखर ओव्हाळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत आपण प्रचंड आशावादी होतो. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपणासोबत आहेत. गेल्या दोन महिन्यांत पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. माता -भगिनींचा मला आशिर्वाद आहे. पूरग्रस्त भागातील जनता आपल्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नसल्याचेही ओव्हाळ यांनी यावेळी स्पष्ट केले. उमेदवारी डावलल्यापासून मला अनेक पक्षातील वरिष्ठांचे दूरध्वनी येत असून काही पक्ष आपणला पुरस्कृत करण्यास तयार आहोत. जनतेचा आशिर्वाद, पुरस्कृत पक्षांची मदत तसेच विकासकामे करण्याची धमक या बळावर आपण विजयी होऊ, असा दावाही ओव्हाळ यांनी यावेळी केला.
विधानसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम – बनसोडे
राष्ट्रवादीकडून आपण इच्छुक होतो. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालो होतो तर 2014 च्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने पराभूत झालो होतो. राष्ट्रवादीकडून मला टिकीट मिळेल याची खात्री होती. मात्र ऐनवेळी मला पक्षाने डावलले असले तरी आपण विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरणार असल्याचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
आपले काय चुकले? हे आत्तापर्यंत मला कळले नसून पक्ष अडचणीत असतानाही मी पक्ष सोडला नाही. आजपर्यंत मी पक्षात कार्यरत होतो मात्र उद्या काही बदल झाला आणि पक्षाने मला उमेदवारी दिली तरी आपण घेणार नसल्याचेही बनसोडे म्हणाले. पिंपरी विधानसभेतील जनतेशी माझी बांधिलकी असून आमदार म्हणून आपण केलेली विकासकामे व आमदार नसतानाही जनतेसाठी केलेले काम या जोरदार व आपण यशस्वी होऊ असेही बनसोडे यावेळी म्हणाले.
अखेर मनसेचा उमेदवार जाहीर; पिंपरीतून कांबळे यांना संधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी विधानसभेसाठी किसन कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी कांबळे यांना ए. बी. फॉर्म दिला. यावेळी राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, सरचिटणीस शिरीष सावंत उपस्थित होते. कांबळे शुक्रवारी (दि.4) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कांबळे यांच्या उमेदवारीमुळे पिंपरी विधानसभेची लढत आता महायुती, आघाडी आणि मनसे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांमध्ये चुरशीची होणार आहे.