विधानसभा निवडणुकीसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल
कराड – कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी सकाळी दाखल केला. कराडमधील नूतन प्रशासकीय इमारतीत निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, मनोहर शिंदे, इंद्रजित गुजर, अशोकराव पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, राजेंद्र माने, प्रदिप जाधव, शंकरराव खबाले, निवास थोरात, नामदेव पाटील, झाकीर पठाण, मोहनराव शिंगाडे, ऍड. प्रकाश चव्हाण, ऍड. अमित जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
सकाळी आ. चव्हाण यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी चव्हाण कुटूंबियांनी त्यांना औक्षण केल्यानंतर ते अकरा वाजता अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारतीकडे रवाना झाले. निवडणूक निर्णय अधिकारी दिघे यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून समाजवादी, पुरोगामी विचारांची ठामपणे पाठराखण केली आहे. तेव्हापासून आजअखेर मतदारसंघातील जनतेने कॉंग्रेस विचाराच्या उमेदवारास साथ दिली आहे. जनता या मूळ विचारापासून कधीच बाजूला जाणार नाही.