प्रचारासाठी उरले अवघे नऊ दिवस

उमेदवारांची धांदल : गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी वातावरण तापले

पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची एकच धांदल उडाली आहे. गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी वातावरण ढवळून
निघाले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे 19 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी थंडावणार आहे. प्रचारासाठी अवघे नऊच दिवस उमेदवारांसाठी उरले आहेत. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला आहे. त्यातच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदार संघामध्ये राजकीय उलथा-पालथ सुरु होती. त्यामुळे लढतीचे चित्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले. त्यातच खंडेनवमी, दसऱ्याचे कार्यक्रम यामुळे उमेदवारांचा जाहीर कार्यक्रमात वेळ गेला. कालपासून (बुधवार) खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेने वेग घेतला आहे.

व्हॉटस्‌ऍपच्या डीपीपासून ते फेसबूकसह इतर सोशल माध्यमांवर चिन्ह पोहचविण्यासाठी वॉर रुममधून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. घरोघरी गाठीभेटींसह प्रचार फेऱ्यांवर सध्या उमेदवारांचा भर दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत मंडळ, महिला बचत गट, सोसायट्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बॅनर, स्टीकर, प्रचार पत्रके छापण्यासाठी एकच धांदल उडाली आहे. वेळ कमी राहिल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचता यावे, यासाठी उमेदवारांचे कुटुंबच प्रचारात उतरल्याचे पहायला मिळत आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून शहरात स्टार प्रचारकांच्या सभा, रॅली, पदयात्रा होणार आहेत. त्यामध्ये अधिकाधिक शक्तीप्रदर्शन घडावे यादृष्टीने उमेदवारांकडून नियोजन सुरू असून राजकीय वातावरण रंगत आहे.

‘जा रे जा रे पावसा’ – मागील तीन दिवसांपासून नियमितपणे सायंकाळच्या सुमारास पाऊस हजेरी लावत असल्याने प्रचारात अडथळा येत आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असला तरी यंदा त्याचा लहरीपणा पाहता तो त्याचा मुक्काम कधी हलविणार याची शाश्‍वती नाही. पावसामुळे सायंकाळची प्रचाराची महत्त्वाची वेळ उमेदवारांच्या हातून निसटत आहे. त्यामुळे “जा रे जा पावसा’ म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.

अधिकृत सोडून वेगळ्याच चिन्हाचा वापर – शहरातील तीन पैकी दोन मतदार संघांमध्ये भाजप विरुद्ध अपक्ष असे चित्र आहे. तर एका मतदार संघामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थेट लढत आहे. कोणत्याही मुख्य पक्षाचा उमेदवार चिंचवड आणि भोसरी मतदार संघांमध्ये नसल्याने अपक्षांना आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. अपक्षानांच राजकीय पक्षांनी पुरस्कृत केले असल्याने पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरही आपल्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह सोडून अपक्षाच्या वेगळ्याच चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.