पक्षांतर करणाऱ्यांवर आत्मचिंतनाची वेळ

हवेलीतून अशोक पवारांना मताधिक्‍य : आयाराम-गयारामांना जनतेने नाकारले

थेऊर – हवेली तालुक्‍याच्या पूर्व भागांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप- शिवसेनेमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या कोलांटउड्याला जनतेने थारा दिला नसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य जनतेने राष्ट्रवादीच्या पारड्यात भरभरून आपली मते टाकल्याने हवेलीमध्ये आमदार अशोक पवार यांना मताधिक्‍य मिळाले आहे.

2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीतील अनेकांनी पूर्व हवेलीतून बाबुराव पाचर्णे यांना साथ देत कमळ फुलवले होते. मात्र, या पराभवातून अशोक पवारांनी योग्य बोध घेत सर्वसामान्यांसोबत संपर्क वाढवला. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाबुराव पाचर्णे यांना पराभूत केले. त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतही विजयश्री खेचून आणली. यामध्ये राहुल पाचर्णे यांना पराभवाची चव चाखावी लागली. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही अशोक पवारांनी राष्ट्रवादीची खिंड लढवत आपल्या कार्यकर्त्याला सभापतिपद देत बेरजेचे राजकारण करीत शिरूर पंचक्रोशीत आपली व्होटबॅंक मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या पराभवानंतरही पाचर्णे यांनी विकासकामांचा रथ सुरूच ठेवला. अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनी आपला झंझावात सुरूच ठेवला होता. महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत आपली ताकद अधोरेखित केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे मोठे मातब्बर नेते प्रदीप कंद यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनीही भाजपाचा रस्ता धरला. त्याचबरोबर पूर्व हवेलीतील अनेक गावांमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याने पाचर्णे यांना ही लढाई खूप सोपी झाल्याचे वाटत होते. मात्र, भाजपाचे निष्ठावंत व नव्याने प्रवेशित झालेले नेते यांच्यामध्ये मानापमाननाट्य घडू लागले. त्यातच जुन्या व नव्यांचा मेळ घालताना मानसन्मान जपताना पाचर्णे यांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे पाचर्णे यांची यंत्रणा अतिआत्मविश्‍वासाने जुन्या व नव्यांच्या वादात अडकून पडली. मतदारसंघातील विकासकामे व शिरूर- हवेलीतील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश, अमित शाह यांच्या रोड शोला झालेली गर्दी आदी कारणामुळे पाचर्णेंही वेगळ्याच हवेत राहिले.

याउलट उरुळी कांचन येथे शरद पवार यांनी सुरुवातीला सभा घेऊन वातावरण राष्ट्रवादीमय केले. त्यानंतर अमोल मिटकरी व खासदार अमोल कोल्हे यांच्या सभांनी अशोक पवार यांना वातावरण निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अशोक पवार यांनी जिल्हा परिषद गटनिहाय, पंचायत समिती गणातून व हवेली- शिरूरमधील प्रत्येक गावांतून आपली यंत्रणा चोख ठेऊन त्याचा आढावाही घेत होते. याकामी त्यांनी कोणावरही जबाबदारी न सोपवता स्वतःच आढावा घेतल्याने त्यांचे संघटनकौशल्य दिसून आले. हवेलीमधील अनेक नेत्यांचे स्व फायद्यासाठी असलेले पक्षांतर सर्वसामान्यांना रूचलेच नाही, हे हवेलीतील पवार यांना मिळालेल्या मताधिक्‍यावरून स्पष्ट झाले आहे.

‘यशवंत’च्या सभासदांची नाराजी भोवली
हवेलीतील यशवंत सहकार साखर कारखान्याबाबत दिलेले आश्‍वासनही भाजप पूर्ण करू शकला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांत यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेत विरले. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासद व कामगारांमधून संताप व्यक्‍त होत होता. या नाराजीचा फटकाही भाजपला बसल्याचे झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.