परतीचा जोर अन् शेतकऱ्यांना घोर

चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न : दूध उत्पादक शेतकरी हवालदिल; भातपिकाचे अतोनात नुकसान

नाणे मावळ – परतीच्या पावसाने राज्यात अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान केले. मावळ तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्‍यात ठिकठिकाणी कापणी योग्य झालेले पीक आडवे झाले, तर कुठे कापलेले भातपीक पाण्यात पूर्णपणे भिजून पेंढा व तांदूळ खराब झाले आहे. भात उत्पादकासह दूध व्यवसाय करणारे शेतकरीही चिंतेत आहेत.

याशिवाय संपूर्ण तालुक्‍यात भातकापणी रखडली आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येत आहे. नायगावामध्ये अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात अंकुश चोपडे, लहू चोपडे म्हणाले की, पावसाचा जोर असाच आठवडाभर चालू राहिला, तर संपूर्ण पीक हातातून जाईल. याशिवाय केलेला खर्च देखील मिळणार नाही. पेंढा भिजल्याने जनावरांसाठी वैरणीचा (चारा) प्रश्‍न गंभीर होईल.

दूध उत्पादक शेतकरी हवालदिल
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारा हिरवा चारा कमी होत चालला आहे. त्यानंतर त्यांची मदार असते ती भाताच्या पेंढ्यावरच. परंतु भात कापणी रखडली आहे. काही ठिकाणी तयार पेंढा पूर्णपणे खराब होऊ लागला आहे. संततधार पावसाने शेती पेरणी योग्य होत नसल्याने मका, बाजरी, घास अन्य हिरव्या चाऱ्याची पेरणीसुद्धा करता येणे शक्‍य नाही.

पशुपालनाचा जोडधंदाच आता वैरणीच्या कमतरतेमुळे पशुपालकांच्या चांगलाच जिव्हारी येत आहे. चाऱ्याच्या टंचाईमुळे व महागाईमुळे जनावरांचे पालन पोषण कसे करावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

चारा पुरवठा करणाऱ्यांचा व्यवसाय ठप्प
उसाचे वाढे, उस व मका या चारा विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पाणी साचल्याने मजूर व वाहन शेतात जात नाहीत. परिणामी दूध उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आह

दिवाळीच्या सुट्ट्या असताना देखील कृषी सहाय्यकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भातपिकांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पीक विमा कंपनीला देखील पीक नुकसानीची माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच पीक पंचनामे सुरू होतील. तसेच मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पीक कंपनीची घाई करू नये व ज्यांनी पिकाची कापणी केलेली आहेत. त्यांनी ती सुरक्षित झाकून ठेवावीत.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.

Leave A Reply

Your email address will not be published.