आळेफाटा पिंपळवंडी दरम्यान अपघात वाढले

पुणे-नाशिक महामार्गाची कामे अर्धवट : वाहतूक कोंडीलाही आमंत्रण : प्रशासनाचे दुर्लक्ष

आळेफाटा – पुणे-नाशिक महामार्गाची अनेक ठिकाणी अपूर्ण कामे आहेत. यामुळे आळेफाटा ते पिंपळवंडी या दरम्यान अपघातांचे प्रमाण वाढले असून ही कामे सुरु होणार कधी, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गाची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे.

चाळकवाडी येथील आनंद मळा येथून आळेफाटा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे; परंतु त्याचे काम अद्यापही सुरु न झाल्यामुळे या ठिकाणाहून पुढे आळेफाट्यापर्यंत जुन्या महामार्गाचाच वापर होत आहे. या अपूर्ण कामामुळे आळेफाटा या ठिकाणी वाहनांची कोंडी प्रचंड होत आहे. तसेच चाळकवाडी येथील मल्हार हॉटेलपासून तर पिंपळवंडी बसस्टॅण्डपर्यंत चौपदरीकरण, सद्‌गुरुनगर येथील उड्डाणपूल चाळकवाडी येथील ओढ्यावरील पूल, कुकडी डाव्या कालव्यावरील पूल, ही सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. मल्हार हॉटेलजवळ चारपदरी रस्ता संपून त्या ठिकाणी पुन्हा दुपदरी रस्ता चालू होत आहे. त्या ठिकाणी वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे वारंवार अपघात होत असतात. तर सद्‌गुरुनगर या ठिकाणी सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या बाजूने वळण काढण्यात आले आहे.

त्या ठिकाणी समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अपघात होऊ शकतो तर चाळकवाडी येथील ओढ्याच्या पुलावर पण तशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे वारंवार अपघात होत आहेत. या पुलाच्या बाजुने रस्ता काढण्यात आला आहे. या ठिकाणी धोकादायक वळण असल्यामुळे दोन्हीही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कायमच अपघात होत असतात.

याच ठिकाणी यापूर्वी कारचा व बसचा अपघात झाला होता तर दुसऱ्या एका अपघातात कार ओढ्यात कोसळली होती. दोन दिवसांपूर्वी पुन्हा याच ओढ्यात कार कोसळून अपघात झाला आहे. या धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यामुळे दोन मोटारसायकलस्वार ओढ्यात पडले होते.

नागरिकांची अपेक्षा ठरली फोल
पिंपळवंडी बसस्टॅंड या ठिकाणी गतीरोधक टाकण्यात आला आहे. हा गतीरोधक उतारावर आहे. त्यामुळे आळेफाट्याकडून येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे अपघात होत आहेत. ही कामे अपूर्ण असल्यामुळे वर्षभरापासून चाळकवाडी टोलनाका बंद आहे. त्यामुळे शासनाचेही नुकसान होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर नारायणगाव बाह्यवळणाचे काम सुरू झाले. त्याचबरोबर इतर अर्धवट कामेही सुरू होतील, अशी अपेक्षा होती; मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.