नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रात आज पाचवा दिवस आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी नांदेडमध्ये सभेला संबोधित केले. नांदेडच्या लोह्यामध्ये कापशी चौकातून राहुल गांधी यांनी पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी अनेक लोकांशी हस्तांदोलन केले. तर काहींशी त्यांनी गप्पाही मारल्या. अशातच राहुल गांधी यांचा नांदेडमध्ये राहणाऱ्या चिमुकली सोबत गप्पा मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाबर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळत आहेत.
‘भारत जोडो यात्रे’दरम्यान नांदेडमध्ये असताना राहुल गांधी यांनी एका चिमुकलीसोबत केलेले संभाषण सध्या सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी तिला भविष्यात काय व्हायचंय? तसेच तिच्याशी संबंधित अनेक प्रश्नांची विचारणा करतात? त्यावेळी या मुलीने दिलेल्या उत्तरांनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.
This video 💕 pic.twitter.com/P2wsueiLCz
— Srinivas BV (@srinivasiyc) November 10, 2022
दरम्यान, नांदेड शहर, देगलूर, अर्धापूर भागातून ही यात्रा शुक्रवारी हिंगोली येथे पोहोचणार आहे. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी करून ‘आर्थिक सुनामी’ आणल्याचा आरोपही केला.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील पाचवा दिवस असून ही यात्रा हिंगोलीत दाखल होणार आहे. दुपारी 3 वाजता चोरंबा फाटा येथून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जाईल. जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.