Baramulla all-time highest voter turnout: जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांच्यासाठी लोकशाहीच्या महान उत्सवापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बारामुल्ला लोकसभा जागेवर आज 59 टक्के मतदान झाले असून, यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघात मागील सर्व लोकसभा निवडणुकांपेक्षा सर्वाधिक मतदान झाले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पीके पॉल म्हणाले, “मी लोकांचे अभिनंदन करू इच्छितो की, सर्व अडचणी असूनही ते इतक्या मोठ्या संख्येने मतदानासाठी आले. हा डोंगराळ भाग आहे आणि काही बर्फाच्छादित भाग देखील आहेत आणि हे सर्व असूनही लोक मतदानासाठी बाहेर पडले. लोक मतदानासाठी आले आणि त्यांनी येथे इतिहास रचला.” या लोकसभा मतदारसंघात एकूण 17,37,865 मतदार आहेत. कुठेही संथ मतदान झाल्याची बातमी नाही.
श्रीनगर मतदारसंघात 38.49 टक्के विक्रमी मतदान झाल्यानंतर, बारामुल्लामध्ये आता सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, असे आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे. बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा आणि बडगाम जिल्ह्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 59 टक्के मतदान झाल्याचं त्यात म्हटलं आहे.
बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातील 2,103 मतदान केंद्रांवर मतदान झाले, ज्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. निवडणूक आयोगाने सांगितले की, संपूर्ण मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि उत्साही मतदारांच्या लांबच लांब रांगा मतदानासाठी थांबल्या होत्या. 2019 मध्ये मतदारसंघात 34.6 टक्के मतदान झाले होते, तर 1989 मध्ये ते फक्त 5.48 टक्के होते. यापूर्वी 1984 मध्ये येथे सर्वाधिक मतदान झाले होते. तेव्हा 58.84 टक्के मतदान झाले होते.
यावेळी बारामुल्ला मतदारसंघातून 22 उमेदवार रिंगणात आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन आणि अपक्ष उमेदवार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनीअर रशीद हे या लढतीतील प्रमुख उमेदवार आहेत. रशीद सध्या तुरुंगात आहेत.
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात श्रीनगर मतदारसंघात 38.49 टक्के मतदान झाले होते, जे 1996 नंतरचे सर्वाधिक आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर खोऱ्यातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे.