पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला आहे. या घटनेप्रकरणी एक दिवस उशिराने शहरातील राजकीय पक्षांना जाग आली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईसह शहरातील बेकादेशीर सुरू असलेल्या पबवर कारवाई करण्याची मागणी भाजप
काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, मनसे तसेच आम आदमी पक्षाकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात बंदी असतानाही रात्री उशिरापर्यंत वरदहस्त मिळत असल्याने शहरात पब संस्कृती बोकाळली आहे. त्यामुळे तरूण पिढी बरबाद होत असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली .
आमदार धंगेकरांचे ठिय्या आंदोलन
“कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणी कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. भरधाव कार चालवत दोन आयटी इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळतोच कसा?’ असा सवाल उपस्थित करत आमदार रवींद्र धंगेकर यांनी येरवडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काॅंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. “शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असून, आधी ड्रग्स आणि आता पब संस्क़ृती वाढत आहे. त्यानंतरही पोलीस प्रशासन काहीच करत नाहीत,’ असा आरोप करत धंगेकर यांनी केला. “पैशांच्या जोरावर राजकीय दबाव आणून हे प्रकरण मिटविले जात आहे,’ असे सांगत पाचशे रुपयांच्या खोट्या नोटा या वेळी झळकवण्यात आल्या.
महायुतीकडून पोलीस आयुक्तांना निवेदन
“पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडले आहे. त्यात नाइट-लाइफ कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने केली. अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, अजय भोसले, माजी आमदार योगेश टिळेकर, गणेश बीडकर, लतिफ शेख, डाॅ. सिद्धार्थ धेंडे या वेळी उपस्थित होते.