पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमास प्रवेशास ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज (दि. २०) मुदत संपली. मात्र, विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी आणखी २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. त्यासाठी २० एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याची मुदत सोमवारी संपल्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
पदवी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा १३ जून रोजी, तर पदव्युत्तरसाठी परीक्षा १४ ते १६ जून यादरम्यान होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ विभागात प्रवेश मिळणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही प्रवेश परीक्षा १०० गुणांची असून, त्यासाठी दोन तासांचा अवधी आहे. प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.