Gurpatwant Singh Pannu : क्रिकेट विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारत पोहोचला असून फायनलमध्येही भारतीय संघानेच विजेतेपद पटकवावे अशी सर्वांची इच्छा आहे. पण त्याच दिवशी देशात मोठा घातपात करण्याची धमकी कॅनडातील खलिस्तान्यांचा प्रमुख गुरपतवंतसिंग पन्नूने दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. १९ नोव्हेंबरला शीख समुदायाने दिल्ली विमानतळावरून विमान प्रवास करू नये, असा इशाराही त्याने दिला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गुरपतवंतसिंग पन्नू व्हिडीओच्या माध्यमातून ही धमकी देताना दिसत आहे.पन्नूने जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. “१९ नोव्हेंबरला जगभरात एअर इंडियाची विमानं जाऊ दिली जाणार नाहीत. १९ नोव्हेंबरला शिख समुदायानं एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करू नये. नाहीतर तुमच्या जिवाला धोका असू शकतो. १९ नोव्हेंबरला दिल्ली विमानतळ बंद राहील. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव शहीद बियंतसिंग, शहीद सतवंत सिंग खलिस्तान एअरपोर्ट असं केलं जाईल. आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून ठेवणार आहोत”, अशी धमकी पन्नूने व्हिडीओमध्ये दिली आहे.
पन्नूचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पन्नूने वर्ल्डकप फायनलचा उल्लेख केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्या दृष्टीने अधिक चोख बंदोबस्त केला जाण्याची शक्यता आहे.
US based khalistani Gurpatwant Singh Pannu released the video & told to sikh people that do not take flight on Nov 19 as their lives are in under threat.
He’s just doing this to get some limelight.
Dog 🐕Barking#Pannu #Khalistani #GurpatwantSinghPannupic.twitter.com/yLawQ0Qq3j
— Rahul Agarwal (@ImRa1999) November 4, 2023
पन्नूच्या सिख्स फॉर जस्टिस अर्थात एसएफजे या संघटनेवर अमेरिकन सरकारने बंदी आणली आहे. अमृतसरमध्ये जन्मलेला पन्नू २०१९पासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. याचवर्षी एनआयएनं पन्नूच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल केला. दहशतवादी कारवायांचं नियोजन करणं, त्या अंमलात आणणं, लोकांमध्ये दहशत निर्माण करणं असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात ३ फेब्रुवारी २०२१ रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जाप केले आहे.