नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केलेले परदेश दौरे चांगलेच चर्चेत आले होते. देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठामपणे मत मांडले. त्यावरून राहुल गांधींवर भाजपाकडून सडकून टीकास्त्र सोडले गेले. आता या टीकेनंतर भाजपाने राहुल गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन तयार केले असल्याचे दिसत आहे. कारण राहुल गांधी हे फक्त एक मोहरा आहेत, अशी टीका या कॅम्पनेमधून करण्यात आली आहे.
भाजपाच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून हे सोशल कॅम्पेन व्हिडीओद्वारे शेअर करण्यात आले आहे. २.२८ मिनिटांचा हा व्हिडीओ असून यावर राहुल गांधी यांचे कार्टून वापरून त्यांच्या भाषणातील ठराविक मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.या व्हिडिओमध्ये राहुल गांधींचे ऍनिमेटेड कॅरेक्टर दाखवण्यात आले असून त्यात,“पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने जगभरात चांगली प्रगती साधली. भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. जगामध्ये भारताचा दबदबा निर्माण केला”, असा दावा भाजपाकडून केला जातो. मात्र, भाजपाचा हाच दावा मोडून काढण्याकरता राहुल गांधी यांनी विदेशी दौरे सुरू करून तेथील माध्यम आणि भारतीय नागरिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.
RaGa….just a pawn! pic.twitter.com/SYxyrDFTi7
— BJP (@BJP4India) June 18, 2023
दरम्यान, तळागाळातील लोकांशी संपर्क ठेवण्याकरता आणि पक्षात आलेली मरगळ दूर करण्याकरता राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. कन्याकुमारी ते काश्मीर असा लांबलचक प्रवास त्यांनी पायी चालत केला. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाला. परंतु, राहुल गांधी भारत जोडो नाही तर भारत तोडोचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे त्यांनी राहुल गांधींसाठी “इंडिया को तोडूंगा…” असं गाणं तयार केलं आहे.
“मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत पुढील सुपरपॉवर बनत आहे. मोदींना २०२४ मध्ये सत्तेपासून बाहेर काढावं लागेल. भारताला आर्थिक महासत्ता बनण्यापासून रोखण्यासाठी ही आपली शेवटची संधी आहे. आपल्याला भारताला तोडण्यासाठी नवनव्या पद्धती शोधायला हव्यात. भारतातील विविध राज्यांना आपल्याला वेगळं करायचं आहे. अल्पसंख्यांकांची माथी भडकावणे, मोदींना कोणत्याही परिस्थितीत नमवायचंच हा परदेशातील भारताविरोधी संघटनांचा डाव आहे आणि त्याला देशातील विरोधी पक्ष साथ देत आहेत”, असं भाष्य या व्हिडीओतून करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांचे परदेश दौऱ्यातील भाषणातील काही वाक्यही या व्हिडीओमध्ये आहेत. “रागा एक आशा, एक पर्याय आहे, भारतासाठी नाही तर भारताविरोधातील शक्तींसाठी. रागाने स्वतःला एका मोहऱ्याच्या रुपात स्वतःला सादर केलं आहे. जेणेकरून भारताला तोडण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकेल”, असा उपहाससुद्धा या कॅम्पेनमधून करण्यात आला आहे.