चंदिगडमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. येथील कोरनाग्रस्तांची संख्या पाहता या भागाला रेड झोन घोषित करण्यात आलं आहे. चंदिगडमध्ये कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, असं असतानाही शहरामध्ये कारण नसताना भटकणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
याच भटक्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आता एक भन्नाट कल्पना लढवली आहे. सोशल डिस्टन्सींग राखत लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्यासाठी चंदिगड पोलिसांनी एक मोठा चिमटा तयार केला आहे. या चिमट्याने चंदिगड पोलीस आता थेट माणसांना पकडणार आहेत.
संसर्गातून पसरणाऱ्या करोनावर मात करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवत करावाई करण्यासाठी पोलिसांनी ही भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. पोलिसांनी तयार केलेला हा मोठ्या आकाराचा चिमटा पाच फूट लांबीची आहे. घरातील पकडीप्रमाणे काम करणाऱ्या चिमट्याच्या आधारे पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडता येणार आहे.