नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हरियाणामध्ये आयोजित एका कार्यक्रमात चांगलेच संतापले असल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान, अमित शाह हे हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्यावर संतापले आणि भर कार्यक्रमात त्यांना भाषण करण्यासाठी रोखले. तसेच तुम्हाला दिलेली वेळ संपली असल्याची आठवण करुन दिली.
हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एका वर्कशॉपचे उद्धाटन करण्यात आलं. यावेळी अनिल वीज यांनी स्वागतपर भाषण केले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर मुख्य भाषण करणार होते. अमित शाह यांचे भाषण शेवटी होणार होते. अनिल वीज यांनी फक्त अमित शाह यांचे स्वागत करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी अचानक हरियाणाचा इतिहास, हरित क्रांतीमधील राज्याचं योगदान, ऑलिम्पिकमधील कामगिरी, खेळासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधा यांसंबंधी सांगण्यास सुरुवात केली.
अमित शाह हे अनिल वीज यांच्या जवळच बसले होते. अनिल वीज यांचे भाषण लांबत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चिठ्ठी पाठवली आणि भाषण संपवा असे सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी माईकवर हात मारत अप्रत्यक्षपणे सूचना केली. पण यानंतरही ते थांबले नाहीत.
#Haryana के गृह मंत्री #AnilVij देश के गृह मंत्री #AmitShah के साथ चल रही बैठक में दे रहे थे लंबा-चौड़ा भाषण। इस बीच शाह ने उनके भाषण को बीच में रोकते हुए कह दी ये बात। पूरा मामला जानने के लिए देखें वीडियो। pic.twitter.com/yxv9MjHJgg
— I.khan S.P.(प्रदेश सचिव अल्पसंख्यक सभा) (@islamkhan919) October 28, 2022
यानंतर मात्र अमित शाह यांचा पारा चढल्याने शेवटी त्यांनी माईक हातात घेतला आणि अनिल वीज यांना भाषण थांबवा सांगितले. “तुम्हाला पाच मिनिटं दिली होती. तुम्ही आधीच साडे आठ मिनिटं बोलला आहात. आता तुमचं भाषण थांबवा. मोठी भाषणं देण्याची ही जागा नाही. थोडक्यात आटोपा,” असं अमित शाह म्हणाले. पण अनिल वीज यांनी काही सेकंद मागून घेतली आणि काही मुद्दे मांडायचे आहेत असं सांगितलं. जेव्हा त्यांचं भाषण अजून वाढत चाललं असल्याचं लक्षात आलं तेव्हा मात्र अमित शाह यांनी त्यांना रोखले. “अनिलजी, मला माफ करा. पण हे असं चालणार नाही. संपवा,” असे अमित शाह यांनी सांगितले.
अनिल वीज भाषणाचा शेवट करणार होते तितक्यात अमित शाह यांना आता बास, पुढील कार्यक्रम सुरु करा अशी सूचना केली. अनिल वीज यांनी अतिरिक्त वेळ घेतल्याने मुख्यमंत्री खट्टर यांनी साडे तीन मिनिटांत आपलं भाषण संपवलं.