बोरी बुद्रुकमधील स्थिती : शेतकऱ्यांनी धरली खासगी डॉक्टरांची वाट
बेल्हे (पुणे) – बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अतिशय मोडकळीस आली असल्याने या दवाखान्यात आपली जनावरे घेऊन येण्यासाठी शेतकरी भीत आहे.
बोरी बुद्रुक येथे श्रेणी 2 चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. ही इमारत अतीशय जुनी असून जीर्ण झालेली आहे तसेच या इमारतीच्या चारही बाजुने गवत वाढलेले असून रस्त्यामध्ये पाणी साचून पूर्णपणे गाळ साचलेला आहे. या दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता देखील नसल्याने जनावरे उपचारासाठी नेण्यासाठी शेतकरी टाळत आहे. तसेच ही इमारत अतीशय जुनी झालेली असल्याने भिंती देखील कमकूवत झाल्या असल्याने इमारत कधीही कोसळून दुर्घटना घडेल या भीतीने शेतकरी या दवाखान्यात न येता आर्थिक झळ सोसून खासगी डॉक्टरांकडे जात आहे. तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते नाईलाजास्तव या दवाखान्यात येत आहे.
बोरी बुद्रुक या दवाखान्याच्या विभागात बोरी, साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपुर ही गावे येतात. या गावांमध्ये संकरीत गायी 4361, देशी गायी 606, म्हशी 597, शेळ्या-मेंढ्या 961 आहेत. एवढी जनावरे असून देखील या ठिकाणी अद्यावत असा दवाखाना नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आपली जनावरे उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे न्यावी लागत आहेत. दरम्यान, या दवाखान्याची नवीन इमारत उभी करण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा देऊ केली आहे. तसेच दवाखाना हा श्रेणी एकचा व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवेलेला आहे. तरी नवीन इमारतीसाठी शासनाने मंजुरी देऊन त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी बोरी बुद्रुक गावच्या वतीने ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच पुष्पा कोरडे यांनी केली आहे.