औषध, सिगारेटचा कंटेनर लुटाणाऱ्या मध्यप्रदेशातील आरोपींवर मोक्का
बारामती (पुणे) – वडगाव निंबाळकर (ता. बारामती)पोलीस ठाणे हदीत दरोडा टाकून औषधांचा आणि सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीने या आधीच विविध सहा राज्यांमध्ये असे कारनामे केल्याचे उघड झाले आहे.
कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय 44), ओमप्रकाश कृष्णा झाला (वय 38), दिनेश वासुदेव झाला (वय 50), सुशिल राजेंद्र झाला (वय 37), मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (वय 42), सतीश अंतरसिह झांझा (वय 40), मनोज केसरसिंग गुडेन (वय 40, रा. सर्व देवास) असे मोक्का लावलेल्या आरोपींची नावे आहेत.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरगाव-नीरा रस्त्यावर 4 जून 2020 रोजी आयशर ट्रक (एनएल 01 एल 4339) या ट्रकमध्ये आयटीसी रांजणगाव कंपनीमध्ये तयार झालेली फिल्टर सिगारेट बॉक्स असा 4 कोटी 61 लाख 88 हजार 820 रूपये किंमतीचा माल भरून तो राजणगाव एम.आय.डी.सी.हून हुबळी कर्नाटक या ठिकाणी घेवून जात असताना राजणगाव एम.आय.डी.सी-न्हावरा-पारगाव-केडगाव-चौफुला-सुपा मार्गे हुबळीकडे जात असताना 13 अनोळखी व्यक्तींनी सिगारेटचा ट्रक दरोडा टाकून लुटला होता.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिसांनी शिरूर हद्दीत दि. 24 जून 203 रोजी ही कारवाई केली होती. या आरोपींना अटक करून गुन्ह्यातील 3 कोटी 89 लाख 34 हजार 792 चा मुदेमाल व दोन ट्रक यातील आरोपींकडून जप्त पोलिसांनी जप्त केला होता. या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया याच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.तो मंजूर करण्यात आला असल्याने या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर अधीक्षक मिलींद मोहीते, बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती विभाग बारामती ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायाक निरीक्षक सोमनाथ लांडे, श्रीगणेश कवितके, विठ्ठल कदम, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ यांनी केलेली होती. पुढील तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहेत.
- राज्याराज्यांमध्ये या आरोपींवर गुन्हे
या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र राज्यात यवत, शिक्रापूर, शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे दाखल होते. परराज्यामध्ये कर्नाटक येथे ब्यादगी, हुबळी, उत्तरप्रदेश येथे खोराबार, पश्चिम बंगाल, ओरीसा, हरीयाणा राज्यात देखील या आरोपींनी औषधे असणाऱ्या ट्रकवर तसेच सिगारेटचे ट्रकवर दरोडा टाकून ट्रकमधील माल लुटून नेल्याचे गुन्हे दाखल होते.
- आत्तापर्यंत बारामती उपविभागात 16 टोळ्यांविरूद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 122 आरोपींविरूद्ध आत्तापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
– नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती.