ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

मुंबई  – हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ट अभिनेत्री शशिकला यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. फिल्म फेअरचे संपादक जितेश पिल्लाई यांनी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मिडीयात प्रसिद्ध केली आहे. त्यांचे मूळ नाव शशिकला जावळकर असे होते. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

काही चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिकाहीं निभावली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत त्या खलनायिका म्हणूनही खूप गाजल्या. त्या मुळच्या सोलापुरच्या होत्या. गरीब स्थितीमुळे त्यांचे कुटुंब मुंबईत आले. शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नृत्य, गायन आणि अभिनय या क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळच्या गाजलेल्या अभिनेत्री नुरजहॉं यांनी त्यांची पारख करून त्यांना चित्रपटात संधी दिली.

नुरजहॉं यांचे पती शौकत रिझवी यांच्या झीनत नावाच्या चित्रपटात त्यांना काम करण्याची पहिली संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करून आपले वेगळेपण सिद्ध केले.

वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी ओमप्रकाश सेहगल यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत. नौ दो ग्यारह, कानुन, जंगली, हरियाली और रास्ता, अनपढ, ये रास्ते है प्यारके, वक्त, देवर, अनुपमा, नीलकमल, हमजोली, सरगम, क्रांती, रॉकी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत. त्यांनी सन 2005 पर्यंत चित्रपटांत काम केले. 2007 साली त्यांना पद्‌मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सन 2009 साली त्यांना व्ही शांताराम पुरस्कारही मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.