पुणे – एकट्याने कॅबने किंवा स्वत:च्या वाहनातून एकट्याने प्रवास करताना नागरिक आता “शेअरिंग’चा पर्याय निवडत आहेत. प्रवाशांसाठी “बजेट फ्रेंडली’, तर वाहनधारकांना इंधनात “शेअरिंग’ होत असल्याने नागरिकांची या पर्यायाला पसंती मिळत आहे. एसटी संपाच्या कालावधीत ही संकल्पना “सुपरहिट’ ठरली. विशेष म्हणजे “शेअरिंग’ वाहनांचा पर्याय उपलब्ध करून देणारे विविध “व्हॉटसऍप ग्रुप’ही सक्रीय झाले आहेत.
पुणे शहरातून दररोज मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अनेकदा सार्वजनिक वाहतूकीच्या वाहनांचे वेळापत्रक बिघडणे, तिकीट उपलब्ध नसणे अशा समस्या भेडसावतात. एसटी संपामुळे तर सहज उपलब्ध आणि विश्वसनीय पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच “शेअर फेरी’चा पर्याय समोर येत असून, त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे-सातारा या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी “व्हॉटसऍप ग्रुप’ सुरू आहे. त्या मार्गावर कोणाला प्रवास करायचा असल्यास ती व्यक्ती संबंधिताला संपर्क करते. केवळ पुणे ते सातारा हा मर्यादित मार्ग आता राहिला नसून, विविध ठिकाणी ये-जा करण्याबाबतची आणि वाहन “शेअरिंग’ची माहिती चालक “शेअर’ करतात. दररोज ये-जा करणाऱ्यांना देखील हे उपयुक्त होत आहे, अशी माहिती पुणे-सातारा ग्रुपचे प्रमुख राजन चाफेकर यांनी दिली.
कॅब कंपन्यांकडूनही पर्याय…
नामांकित कॅब कंपन्यांकडून देखील “शेअरिंग’चा पर्याय देण्यात येत आहे. प्रामुख्याने विमानतळ, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी जाण्यासाठी शेअरिंग कॅबला अधिक पसंती मिळत आहे. यामुळे भाडे देखील विभागले जात असल्याने, हा पर्याय प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्याचे प्रवासी सांगतात.