पुणे –इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 18 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ दिली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास 19 ते 28 डिसेंबर असा कालावधी देण्यात आलेला आहे. महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 3 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या सादर करण्यासाठीन 7 जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे, असे राज्य मंडळाचे डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी मुदतवाढ
इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे विलंब शुल्कासह 18 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी 13 ते 18 डिसेंबर अशी मुदत आहे. त्यानंतर विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी 19 ते 24 डिसेंबर अशी मुदत असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.