वाघोली (पुणे) – पुणे शहरालगत असणाऱ्या हवेली तालुक्यातील वाघोली गावात भाजीपाला विक्रेत्यांची करोना तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेत्यांचीच तपासणी का? किराणा, चिकन, मटन, मासे, डेअरी, मेडिकल, चहा विक्रेते व इतर दुकानात देखील गर्दी होऊन सोशल डीस्टन्सिंग पाळले जात नाही, त्यांची सुद्धा करोना तपासणी व्हावी, अशी मागणी भाजीविक्रेते व ग्रामस्थांनी केली आहे.
वाघोली सर्कलच्या असिस्टंट इन्सीडेंट कमांडर रोहिणी आखाडे यांच्या उपस्थितीत बैठकीत वाघोलीतील वाढत्या करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजीविक्रेते विक्री करताना सोशल डीस्टन्सिंग पाळत नाही, सुरक्षेची काळजी घेत नसल्याचा मुद्दा आला होता. त्यानुसार वाघोलीतील भाजीपाला विक्रेत्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना तपासणी करण्याचे ठरले. तपासणी केलेल्या विक्रेत्यांना भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला तसेच भाजी विक्रेत्यांना सायंकाळी 5 पर्यंतच विक्रीची अनुमती देण्यात यावी असाही निर्णय झाला आहे.