Vasant More । Sanjay Raut : पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्षातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पक्षांतर्गंत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत आपल्या भावना मांडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. वसंत मोरेंच्या राजीनाम्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून, उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर मत व्यक्त करताना राऊत म्हणाले, मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी का दिली? याबद्दल त्यांनीच प्रतिक्रिया दिली पाहीजे.
ते लोकसभा लढविणार असतील तर कोणाकडून लढविणार आहेत? आमची एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. कारण ते स्तःच स्वच्छ आहेत. पुण्यामध्ये जसे रवींद्र धंगेकर आहेत, तसे माझ्या माहितीप्रमाणे वसंत मोरे आहेत.” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
वसंत मोरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू ! । Vasant More । Sanjay Raut
‘आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.
वसंत मोरे माध्यमांसमोर गऱ्हाणे मांडू लागले. पुणे शहरातील पक्षातील नेत्यांच्या वागणुकीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे पक्षाच्या वरिष्ठांकडे सु्द्धा याबाबत तक्रार करुनही आपली दखल घेतली गेली नाही, याचं शल्य आपल्या मनात टोचत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. वसंत मोरे यांचा चेहरा यावेळी अनेक प्रश्नांचं उत्तर देताना दिसला.
पुण्यातला मनसेचा वाघ अशी ख्याती असलेला नेता आज भावूक झालेला बघायला मिळाला. या नेत्याने आज मनसेला सोडचिठ्ठी दिलीय. मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे. । Vasant More । Sanjay Raut