छोट्या पडद्यावरच्या अनेक रिऍलिटी शोमधून झळकणारा बॉलीवूडचा कोरियोग्राफर रेमो डिसुजा सध्या काहीसा डिप्रेशनमध्ये गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. त्याच्या “स्ट्रीट डान्सर 3′ या चित्रपटाला सिनेप्रेक्षकांनी एक दिवसही थिएटरमध्ये टिकू दिले नाही. साहजिकच यामुळे त्याच्या दिग्दर्शनकौशल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषतः वरुण धवन स्वतःच त्याच्यावर नाराज आहे.
याचे कारण या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचूनच वरुणने त्याविषयीची नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यावेळी वरुणने दिलेल्या सूचनांबाबत रेमोने फारसा गांभीर्याने विचार केला नाही. किंबहुना, त्याच्याकडे साफ दुर्लक्षच केले होते. पण आता चित्रपट आपटल्यानंतर रेमोबाबा स्वतःच म्हणतो की, वरुणच्या सूचना तार्किक होत्या. रेमोला उशिरा शहाणपण सुचले असले तरी आता वरुणची मनधरणी करण्यात त्याला यश येत नाहीये.
वरुण इतका चिडलेला आहे की त्याने यापुढे कधीही रेमोसोबत काम करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. वरुणच्या या निर्णयामागे त्याचे वडील डेव्हिड धवन यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. कारण वरुणला सोबत घेऊन रेमोला आपली नौका तिराला न्यायची आहे, हे बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ घालवलेल्या डेव्हिड धवन यांनी बरोबर ओळखले आहे. वास्तविक, “एबीसीडी’ चित्रपटापासूनच रेमो दिग्दर्शक म्हणून साफ अपयशी ठरत आला आहे. एबीसीडी 2, फ्लाईंग जेट, रेस 3 यांसारख्या चित्रपटांनी त्याला अजून मागे ढकलले. त्यामुळे वरुणला वडिलांचा सल्ला आता पटला आहे.