पुणे – महारयत ऍग्रोइंडिया कंपनीतून शेतकऱ्यांची 5 कोटी 82 लाखांची फसवणूक करणाऱ्या आणखी एकास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुधीर मोहिते (रा. इस्लामपूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी प्रीतेश माने याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नीलेश आंबेडे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत जगदाळे, संदीप मोहिते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 फेब्रुवारी 2019 पासून घडली आहे.
शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायातून होणाऱ्या फायद्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. सुधीर मोहिते हा महारयत ऍग्रोचा संस्थापक अध्यक्ष आहे. आतापर्यंत 197 शेतकऱ्यांचे फसवणुकीबाबत अर्ज प्राप्त झाले आहे. मोहिते याच्या बॅंक खात्यांची माहिती घ्यायची आहे. त्यांनी इतर पाच कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्यासंदर्भात सखोल तपास करायचा असल्याने सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.