पुणे -कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
“एक पाऊल विश्वासाचे’ या उपक्रमाने सप्ताहाचे उद्घाटन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष व आमदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.
सोनिया गांधी यांनी 2004 साली पंतप्रधान पदाचा त्याग केला. तेव्हापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सप्ताह साजरा केला जात असून, यंदा सप्ताहाचे 18 वे वर्षे आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील यात्रे दरम्यानच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन 7 ते 9 डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. महिला पत्रकारांसाठी पूना हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी “राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. एड्स नियंत्रण जनजागृतीसाठी देवदासींच्या उपस्थितीत सामुदायिक शपथ आणि चित्र प्रदर्शन बुधवार पेठेतील गुजराती शाळेत 7 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. “गाथा रयतेच्या राजाची’ हा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम शहरात विविध भागांत सादर होणार आहे.
महाविद्यालयीन 76 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप, तृतीयपंथीयांशी संवाद आणि सन्मान, सुकन्या समृद्धी योजना कार्ड वाटप, महाआरोग्य तपासणी शिबीर, स्त्री-पुरुष समानता विषयावर चर्चा, “आईला सुटी’ हा गृहिणींसाठी अभिनव उपक्रम, बॉक्सिंग स्पर्धा, महिलांसाठी रोजगार मेळावा आदी कार्यक्रमांचा सप्ताहात समावेश असणार आहे, असे मोहन जोशी यांनी सांगितले.